शुभमन गिल इंग्लंडला रवाना   

मुंबई : रोहित शर्माने निवृत्ती घेतल्यानंतर भारतीय कसोटी क्रिकेट संघाचे नेतृत्त्व शुभमन गिलकडे देण्यात आले आहे. रिषभ पंत उपकर्णधार असेल. भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका सुरु होण्यापूर्वी भारत अ संघ इंग्लंडमध्ये दोन प्रथम श्रेणी क्रिकेटचे सामने खेळणार आहे. या संघाचं नेतृत्त्व मात्र शुभमन गिलकडे देण्यात आले नाही. आयपीएलच्या एलिमिनेटरमधून गुजरात टायटन्स बाहेर गेल्यानें शुभमन गिल लवकरच इंग्लंडमध्ये दाखल होईल. तिथे तो एका प्रथम श्रेणी सामन्यात खेळणार आहे. याचे नेतृत्त्व बीसीसीआयने अभिमन्यू ईश्वरनकडे दिले आहे. शुभमन गिल त्याच्या नेतृत्त्वात खेळेल.
 
भारतीय क्रिकेट संघाची कसोटी मालिका २० जूनपासून सुरु होणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ कसोटी सामने होणार आहेत. त्यापूर्वीच भारत अ संघ इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. पहिली मॅच ३० मे पासून सुरु झाली आहे. यामध्ये भारत अ संघाने करुण नायरच्या २०४ धावांमुळे ५५७  धावा केल्या आहेत.   

अभिमन्यू ईश्वरनकडे संघाचे नेतृत्त्व

शुभमन गिल आयपीएल प्लेऑफमुळे भारत अ विरुद्ध इंग्लंड लायन्स संघाविरुद्ध खेळू शकला नव्हता. गिल ६ जूनपासून सुरु होणारी दुसरा  सामना खेळू शकतो. मात्र तो भारत अ संघाचा कॅप्टन नसेल. भारत अ संघाचे कर्णधारपद २९ वर्षांच्या अभिमन्यू ईश्वरनकडे देण्यात आले आहे. दुसर्‍या सामन्यामध्ये देखील तोच संघाचे नेतृत्त्व करेल, अशी शक्यता आहे. यामुळं शुभमन गिलला दुसर्‍या सराव सामन्यात इंग्लंड लायन्स विरुद्ध अभिमन्यू ईश्वरनच्या नेतृत्त्वात खेळावं लागेल.  
 
शुभमन गिल सोबत साई सुदर्शन देखील दुसर्‍या मॅचसाठी भारत-अ संघात दाखल होईल. याशिवाय केएल राहुल यानं देखील दुसर्‍या सराव सामन्यात खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. बीसीसीआयनं त्याला देखील मंजुरी दिली आहे. भारत अ विरुद्ध इंग्लंड लायन्स या सामन्यात तो खेळताना दिसू शकतो. 

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेचे वेळापत्रक

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका २० जूनपासून सुरु होणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं कसोटीमधून निवृत्ती घेतल्यानंतर भारताला इंग्लंडमध्ये यंग ब्रिगेडच्या जोरावर विजेतेपद मिळविणे आव्हानात्मक असेल.इंग्लंडला देखील भारताविरुद्ध कसोटी मालिकेत २०१८ नंतर विजेतेपद मिळालेले नाही.भारताला देखील न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर कमबॅक करायचे आहे.
 
पहिली कसोटी: २०-२४ जून (लीड्स)
दुसरी कसोटी: २-६ जुलै (बर्मिंघम)
तिसरी कसोटी: १०-१४ जुलै (लॉर्ड्स)
चौथी कसोटी: २३-२७ जुलै (मँचेस्टर)
पाचवी कसोटी: ३१ जुलै-४ ऑगस्ट (द ओवल)
 

Related Articles